उंच माझा झोका ही रमाबाई रानडे यांच्या चरित्रावर आधारलेली मालिका आता संपण्याच्या बेतात आहे. त्यानी स्वत; लिहिलेल्या ‘आठवणीं’चा आधार घेऊन पूर्वार्ध घडला. तो बराचसा त्या पुस्तकाला धरून होता असे पुस्तक वाचलेल्या माझ्यासारख्याना वाटले. अर्थात काही बाबतीत थोडे स्वातंत्र्य घेणे आवश्यक होते व ते प्रमाणातच घेतले जात होते.
मात्र न्यायमूर्ति रानड्यांच्या मृत्यूनंतरचा कथाभाग लिखित हकीगतींवर किती आधारलेला आहे याबद्दल संशय वाटतो. रानड्यांचे भाऊ व घरातील इतर व्यक्ति या प्रत्यक्ष होऊन गेलेल्या असल्यामुळे त्यांचे चित्रण सत्याला धरूनच व्हायला हवे. त्यात फेरफार केल्यास ते त्या व्यक्तींवर अन्याय करणारे व त्यांचे वारस असणार्याना मनस्ताप देणारे ठरू शकते. विषेशतः नीळकंठ ऊर्फ ‘आबा’ किंवा ‘नानू’ यांच्या उभ्या केलेल्या व्यक्तिमत्वांना लिखित सत्याचा आधार कितपत आहे असा प्रष्न पडतो. याबाबत निर्मात्यानी काही खुलासा करणे आवश्यक वाटते. मालिकांचा उद्देश ‘करमणूक’ असा असला तरी विकृत चित्रण करण्याचा निर्मात्यांना अधिकार नाही.
रमाबाई रानड्यांच्या कार्यामध्ये काशीबाई कानिटकरांचा मोठा सहभाग दाखवला आहे. त्या लेखिका खर्या पण त्यांच्या या प्रमुख सहभागाबद्दलचा उल्लेख त्यांच्याबद्दल वाचावयास मिळणार्या माहितीत मला आढळला नाही. मात्र तो नसेल असे मला म्हणावयाचे नाही.
No comments:
Post a Comment