रोज वर्तमानपत्रे वाचताना वा बातम्या ऐकताना वा इतर वेळीहि काही सुचत राहातं जे लोकांसमोर मांडावं असं वाटतं. अशा विषयांवर वेळोवेळी येथे लिहिणार आहे. वाचकाना हा उपक्रम आवडेल आणि त्यांच्याहि विचारांना चालना देईल अशी आशा आहे.
Monday, June 10, 2013
दोन अज्ञात हकिगती
अमेरिकेत आल्यावर लगेचच येथील एक मासिक हातात पडले. India Currents हे त्याचे नाव. त्यात दोन लेख वाचले. त्यात अनपेक्षितपणे दोन ऐतिहासिक उल्लेख वाचावयास मिळाले.
पूर्वी वाचले होते कीं दुसर्या महायुद्धाचे वेळी अमेरिकेने एक लाखाचे वर अमेरिकेच्याच जपानी वंशाच्या नागरिकाना अटक न करता एका Concentration Camp मध्ये संपूर्ण युद्धकाळपर्यंत अडकवून ठेवले होते. त्यांची आयुष्ये उध्वस्त झालीं. हे निव्वळ ते लोक मूळचे जपानी या एकाच कारणासाठी केले होते. हे वाचले तेव्हां वाटले होते कीं केवढा हा अन्याय? मात्र माझ्या केव्हाही वाचनात आले नव्हते कीं भारतानेहि असे काही केले होते! १९६२ च्या चीन बरोबरच्या युद्धाचे वेळी कलकत्त्यातील चिनी वंशाच्या भारतीय नागरिकाना भारत सरकारने असेच उचलून राजस्थान मध्ये अडकवून ठेवले होते! वयाच्या १४व्या वर्षी या घटनेला तोंड द्यावे लागलेल्या एका महिलेने यावर एक पुस्तक लिहिले आहे व ते अमेरिकेत प्रसिद्ध झाले आहे. अडकवलेल्यांपैकी अनेकजण अखेर अमेरिकेला पोचले त्यातील एका स्त्रीने हे पुस्तक लिहिले आहे. मात्र अजूनही ती स्वतःला भारतीयच म्हणवते.
दुसरी हकीगतहि अशीच आश्चर्यकारक आहे. १९२० च्या सुमाराला भारतीय माणसे अमेरिकेत येऊ शकत होतीं नंतर काही काळाने अमेरिकेने आपले दरवाजे भारतीयांसाठी बंद केले. कलकत्ता भागातील काही पुरुष तेव्हा अमेरिकेत गेले त्यांचा भारतातील व्यवसाय चिकनकारीचे कापड विकणे! बंगालमधील स्त्रियांनी हाताने बनवलेले असे कापड ते फेरीवाल्याचा व्यवसाय करून विकीत. हे पुरुष अमेरिकेत गेले व तेथेहि फेरिवाल्याचाच व्यवसाय न्यूयॉर्क भागात करीत. मात्र त्याना रहावयास जागा गोरे लोक देत नसत. पण आफ्रिकन-अमेरिकनानी त्याना जवळ केले! त्यांच्याच भागात ते राहू शकत. बहुतांश, हे लोक मुसलमान धर्माचे होते. त्यानी आफ्रिकन-अमेरिकन स्त्रियांशी लग्ने केलीं व तेथेच पाय रोवले. त्या समाजातील एका तरुण स्त्रीने आपल्या कुटुंबातील व्यक्तींकडून ऐकलेल्या जुन्या काळच्या हकिगतींच्या आधारे आपले भारतातील मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. मूळ गावाचे नाव अपभ्रंश झाल्यामुले ओळखू येणे सोपे नव्हते. पण घरातील एका खूप जुन्या भारतातून आलेल्या पत्रावरच्या पोस्टाच्या शिक्क्यावरून ती आपल्या बंगालमधील मूळ गावापर्यंत पोचली. गावकर्यांशी जुन्या हकिगतींबद्दल बोलताना असे लक्षात आले कीं तिच्या आजोबांप्रमाणे साधारण त्याच काळात इतरहि गावकर्यांचे आजोबा-पणजोबा तसेच गाव सोडून परागंदा झाले होते मात्र ते अमेरिकेत पोचल्याचे कोणाला माहीत नव्हते. त्या स्त्रीनेहि आपली कथा पुस्तकरूपाने सांगितली आहे. ‘पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन …’ हे सार्थच आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment