रोज वर्तमानपत्रे वाचताना वा बातम्या ऐकताना वा इतर वेळीहि काही सुचत राहातं जे लोकांसमोर मांडावं असं वाटतं. अशा विषयांवर वेळोवेळी येथे लिहिणार आहे. वाचकाना हा उपक्रम आवडेल आणि त्यांच्याहि विचारांना चालना देईल अशी आशा आहे.
Saturday, February 9, 2013
फाशीची शिक्षा
दिल्लीतील भयानक बलात्कार प्रकरणानंतर फाशीच्या शिक्षेबद्दल बरीच चर्चा झाली. आता काही विशिष्ट स्वरूपाच्या बलात्कार गुन्ह्यांसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद वटहुकुमाने झाली आहे.
जगात अनेक देशात फाशीची शिक्षा कायद्यांतून काढून टाकण्यात आली आहे. अमेरिकेतहि काही राज्यात ती बंद झाली आहे व इतरत्र तशी जोरदार मागणी आहे. त्याबाबतची तात्विक चर्चा नेहेमी चालतेच पण या विषयाला आणखीहि एक बाजू आहे व ती्हि वेळोवेळी पुढे येत असते. ती म्हणजे काही वेळेला निर्दोष व्यक्तीलाहि अशी शिक्षा होऊ शकते व निव्वळ अपीले चालू असल्यामुळे शिक्षा अमलात आलेली नसतानाच काही नवीन पुरावा उघडकीस येऊन ती व्यक्ति निर्दोष असल्याचे सिद्ध होऊन तिची सुटका होते. अशी उदाहरणे अगदीं किरकोळ असलीं तरी असे होऊ शकते ही गोष्ट फाशीच्या शिक्षेबद्दल चर्चा करताना विचारात घ्यावीच लागते. DNA तंत्रज्ञान वापरात आल्यानंतर अशा घटना अनेकवार उघडकीस येऊ लागल्या आहेत.
अमेरिकेतील कर्क नोबल ब्लडवर्थ नावाच्या माणसाची हकीगत विलक्षण आहे. फाशीची शिक्षा झालेला पण DNA चाचणीमुळे निर्दोषत्व सिद्ध होऊन तुरुंगाबाहेर आलेला हा अमेरिकेतील पहिला माणूस! १९८४ साली हा मनुष्य कसलाही गुन्हा न केलेला एक निवृत्त मरीन सोल्जर होता व मेरीलॅंड राज्यात तो प्रामाणिकपण जगत होता. त्याच्या शेजारणीने टी व्ही वर एका संशयित फरारी आरोपीचे पोलिस-रचित चित्र पाहिले व तिला ते ब्लडवर्थचेच वाटले व तिने पोलिसांस कळवले. त्या व्यक्तीवर ९ वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार व तिचा खून केल्याचा संशय होता. कसे कोणास ठाऊक पण ब्लडवर्थला पकडून नेल्यावर त्याच्यावर झटपट खटला चालून त्याने मुळीच न केलेल्या गुन्ह्यांबद्दल फाशीची शिक्षाहि झाली.
त्याने व त्याच्या वकिलानी अपील प्रक्रिया जोरात चालू ठेवली. ९ वर्षे तुरुंगात गेली. मग DNA तंत्रज्ञान उपलब्ध झाले. बर्याच प्रयत्नांनंतर त्याच्या केसमध्ये ते तंत्रज्ञान वापरले गेले व १९९३ मध्ये तो निर्दोष ठरून तुरुंगातून बाहेर आला! अनेक वकिलांची तरीहि त्याच्या निर्दोषित्वाबद्दल खात्री पटली नव्हतीच.
त्यानंतर फाशीची शिक्षा रद्द होण्यासाठी चाललेल्या देशभरच्या चळवळींमध्ये त्याने नेहेमीच पुढाकार घेतला. व अजूनहि घेत असतो. आपले निर्दोषित्व सिद्ध झाले एवढ्यावरहि त्याचे समाधान झाले नाही. त्या बालिकेला न्याय मिळण्यासाठी खरा गुन्हेगारहि सापडणे आवश्यक होते. देशभर अनेक कारणांनी अनेक गुन्हेगारांची व संशयितांची DNA चाचणी होऊन हळूहळू एक मोठी राष्ट्रीय DNA DATABASE तयार होऊ लागली होती. तिच्याशी तुलना करण्याचा आग्रह ब्लडवर्थ व त्याच्या वकिलानी धरला होता. अखेर त्याप्रमाणे शोध घेतल्यावर खरा गुन्हेगारहि ओळखला गेला व त्याच्यावर गुन्हा शाबित झाला.
मला नवल वाटते वाटते कीं अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात निर्दोष माणसाला फाशीसारखी शिक्षा होऊंच कशी शकते? भारतामध्ये असा प्रकार होत असेल काय? आपल्या येथे ज्यूरी पद्धत नाहीं. आपल्या सेशन कोर्ट, हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट अशा तीनहि ठिकाणी असे होणे असंभव वाटते. संशयाचा फायदा मिळून आरोपी सुटण्याची शक्यताच जास्त. फाशीची शिक्षा ही तर Rarest of Rare Case मध्येच द्यावयाची असल्यामुळे गुन्हा निस्संदिग्धपणे सिद्ध झाल्याशिवाय फाशीची शिक्षा दिली जाणार नाहीच. त्यामुळे असा घोर अन्याय भारतात होणार नाही असे वाटते. अमेरिकेत मात्र गेल्या ४० वर्षात विना-अपराध शिक्षा झालेल्या व नंतर सुटलेल्या व्यक्तींच्या अशा १४२ केसेस झाल्या आहेत व सुटकेसाठी त्यातील तील फक्त १८ केसेस मध्ये DNA टेस्ट्चा उपयोग झाला असे ब्लडवर्थ संबंधीच्या बातमीत म्हटले होते. म्हणजे इतर केसेस मध्ये पुराव्यातील इतर त्रुटीच उघडकीस आणल्या गेल्या असाव्यात, ज्या सर्व कोर्टांच्या नजरेतून सुटल्या होत्या! न्यायदेवता सगळीकडे आंधळीच!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment