रोज वर्तमानपत्रे वाचताना वा बातम्या ऐकताना वा इतर वेळीहि काही सुचत राहातं जे लोकांसमोर मांडावं असं वाटतं. अशा विषयांवर वेळोवेळी येथे लिहिणार आहे. वाचकाना हा उपक्रम आवडेल आणि त्यांच्याहि विचारांना चालना देईल अशी आशा आहे.
Sunday, February 17, 2013
रेल ते ट्रेल
अमेरिकेत सर्व देशभर पसरलेले विस्तृत असे रेल्वेचे जाळे एकेकाळी कार्यरत होते हे बहुतेकाना माहीत आहे. या रेल्वेजाळ्याचा अमेरिकेच्या आर्थिक प्रगतीत फार मोठा वाटा होता व एकदेशत्वाची भावना निर्माण करण्यातहि त्याचा वाटा भारताप्रमाणेच मोठाच होता. मात्र, दुसर्या महायुद्धानंतर अमेरिकाभर राष्ट्रीय महामार्गांचे, उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम असे प्रचंड जाळेच निर्माण झाले व मोटारीने सर्व देशभर प्रवास सुलभ झाला. व्यक्तिगत प्रवासासाठी रेल्वे ऐवजी स्वतःची कार हीच सर्वांची प्रथम पसंती होऊ लागली. माल-वाहतुकीसाठीहि प्रचंड आकाराचे ट्रक वापरात आले. विमान-सेवांचे जाळे देशभर पसरल्यावर कार-प्रवासाइतकेच विमानप्रवासाचेहि दिवस आले. या सर्वाचा परिणाम रेल्वेसेवांवर होऊन अनेक भागांतील रेल्वे सेवांची उपयुक्तता भराभर कमी होऊन तोट्यात जाऊ लागली व दिवसेंदिवस बंदहि होऊं लागली. आता न्यूयॉर्क-बोस्टन-वॉशिंग्टन हा त्रिकोण सोडला तर इतरत्र चालू रेल्वे सेवा शोधाव्याच लागतील! कोठेकोठे Tourist Attraction या स्वरूपात त्या चालतात. मुंबई लोकलसारखी सेवा सान-फ्रानन्सिस्को शहरात आहे. मेट्रो (जमिनीवरून व खालून) बर्याच शहरात आहेत. मात्र लांबपल्ल्याच्या रेल्वेसेवा जवळपास नाहीतच. लॉस-एंजेलिस ते सानफ्रान्सिस्को अशी नवीन रेल्वेलाइन बांधण्याचा प्रकल्प अनेक वर्षे चर्चेत आहे. अमेरिकेत भारतासारखी सरकारी रेल्वेकंपनी कधीच नव्हती, त्यामुळे ‘ही रेल्वे बंद पडू दिली जाणार नाही’अशी पोकळ आश्वासने व घोषणाहि नव्हत्या (बहुतेक!)
रेल्वे सेवा बंद पडली मग रेल्वेमार्गाचे काय झाले? मी सॅन-रॅमॉन येथे मुलाकडे अनेकदा राहिलो. हे शहर सॅन्फ्रान्सिस्कोच्या जवळ आहे. या शराच्या शेजारच्या डब्लिन-प्लेझंटन या जोड शहरापर्यंत या भागातील मुंबई-लोकलसदृश B. A. R. T. ही चालू रेल्वे सेवा येते. सॅनरॅमॉन शहरातूनहि पूर्वी एक रेल्वे फाटा जात होता तो बंद पडलेला आहे. त्याचे रूळ व स्लीपरहि काढून नेलेले आहेत. मात्र ट्रॅकवर अतिक्रमण होऊन झोपड्या उठलेल्या नाहीत. रेल्वेच्या मार्गाचे एका बर्यापैकी रुंद रस्त्यात रूपांतर झालेले आहे. मात्र हा वाहनांच्या वाहतुकीचा रस्ता नाही. अर्धा रस्ता कॉंक्रीटचा केला आहे. अर्धा खडीचा-डांबराचा आहे. त्यावरून सकाळ-संध्याकाळ, थंडीच्या दिवसात भर दुपारीहि, मुलांच्या-क्वचित मोठ्यांच्याहि-सायकली चालतात वा पादचारी एकेकटे वा घोळक्याने रमतगमत चालतात/धावतात. मीहि या रस्त्यावरून अनेकदा रमतगमत फिरलो आहे. मूळचा रेल्वे रस्ता असल्यामुळे याला Iron Horse Trail असे नाव आहे. (हे बहुधा तेथे पूर्वी धावणार्या रेल्वे इंजिनामुळे पडले असावे!) पुण्याच्या लॉ-कॉलेज रस्त्याजवळील जुन्या कालव्याच्या बदललेल्या स्वरूपाची तेथे आठवण येते.
आता अमेरिकेतल्या इतरहि अनेक शहरांमध्ये बंद पडलेल्या रेल्वेट्रॅकचा वापर अशा प्रकारे जनतेच्या सुखसोईसाठी करण्याचे काम चालू आहे. अटलांटा शहराबद्दल हल्लीच अशी बातमी माझ्या वाचनात आली. तेथे २२ मैल रेल्वे ट्रॅकचे रूपांतर करण्याचे काम २००० पासून चालू आहे. २-३ मैल तयार झालेल्या ट्रेलला लागूनच एक जुन्या फर्निचरचे मोठे दुकान होते मात्र ट्रेल ही त्याची मागील बाजू होती. ट्रेलवर माणसांची वर्दळ भरपूर सुरू झाल्यामुळे व धंदा दसपट वाढल्यामुळे आता मागल्या बाजूलाहि दरवाजे करून गिर्हाइकांची सोय करण्यात येत आहे. कॉफीशॉप उघडले आहे. मालक म्हणतात, ‘हे सारे स्वप्नवत आहे. आम्हाला मागल्या बाजूने चोर्या होण्याची भीति वाटे आता तिकडून आम्हाला भरपूर गिर्हाइक मिळते!’
‘योजकस्त्तत्र दुर्लभः’ हे कधीकधी खोटेहि ठरते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment