अल्पवयीन गुन्हेगाराकडून गंभीर गुन्हा घडला असला तर त्याला काय शिक्षा व्हावी? अशा एका अमेरिकन गुन्हेगाराची कहाणी विचार करायला लावणारी आहे.
मॉरिस बेले नावाच्या एका १५ वर्षांच्या मुलाचे हातून त्याच्याच एका वर्गभगिनीचा १९९३ मध्ये खून झाला. त्यांचे परस्परांवर प्रेम होते व ती गर्भवती झाली होती. गुन्हा सिद्ध झाल्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. अमेरिकेत जन्मठेपेची शिक्षा म्हणजे आयुष्यभराची, भारताप्रमाणे १४ वर्षांची नव्हे! तीहि without parole म्हणजे तात्पुरती सुटका देखील मिळत नाही! अनेक वर्षे तुरुंगात राहून झाली. अजूनहि त्याला प्रष्न पडतो कीं आपल्या हातून तो गुन्हा घडलाच कसा?
जून महिन्यामध्ये येथील सुप्रीम कोर्टाने १८ वर्षांखालील गुन्हेगाराना मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देणे बंद केले आहे. मॉरिसे बेले सारखे इतर २००० पेक्षां जास्त अशी शिक्षा भोगत असलेले गुन्हेगार आहेत. जरी हा निर्णय ‘पूर्वलक्षी प्रभावाने’ लागू झालेला नसला तरीहि या निर्णयामुळे त्याना थोडी आशा निर्माण झाली आहे. मात्र दयेचा विचार करावयाचा तर त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. बेलेची केसच पहा.
त्याने मारलेल्या आपल्या मैत्रिणीचे नाव क्रिस्तिना. बेले आफ्रिकन अमेरिकन, क्रिस्तिना गोरी. दोघेहि सर्वांना आवडणारीं. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम. क्रिस्तिनाला मूल हवे होते पण बेलेला नको होते. बेलेचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनिअर, त्यांचे गोर्या सहकार्यांशी पटत नसे. त्याना आपल्या मुलाने गोर्या मुलीवर प्रेम करणे मान्य नव्हते. एकदा त्याने अचानक घरी आला असता त्या दोघाना बेडवर पाहिले. त्याने मुलीला हाकलून दिले आणि आपल्या मुलाला बडवले. बेलेच्या आईला क्रिस्तिना पसंत होती. तीहि सुशिक्षित होती. मुलांचे चाळे तिला पसंत नव्हते पण क्रिस्तिना गरोदर झाल्यावर बेलेच्या आईने तिला धीर दिला होता. खुनाच्या आदल्या दिवशी क्रिस्तिनाने मैत्रिणीला म्हटले कीं तिने आपल्या आईवडिलाना आपण गर्भवती असल्याचे सांगायचे ठरवले आहे. आणि ती बेलेला दुसर्या दिवशी भेटून पुढचे ठरवणार होती.
दुसर्या दिवशी मॉरिस तिला भेटला पण त्याने तिच्यावर सुर्याचे अनेक वार करून तिला मारले, सुरा झुडपात लपवला आणि घरी निघून गेला. घरी वडील भेटल्यावर त्यांच्या रागाचे कारण आता संपले हे त्याला जाणवले.
परिसरातील इतर मुलाना क्रिस्तिनाचे प्रेत मिळाल्यावर पोलिसांना बोलावले गेले. क्रिस्तिनाच्या घरी तिच्या डायरीतून तिच्या व बेलेच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच पोलिस बेलेच्या घरीं पोचले. त्याचे उद्गार – ‘तुम्ही येणार असे वाटलेच होते.’
कोर्टातील खटल्यामध्ये बेलेच्या वतीने बचावाचा भर त्याच्यावर आलेल्या प्रचंड ददपणाचा होता. त्याच्या वडिलानी साक्ष दिली कीं ‘मुलगी नासवलीस तरी मी तुला ठार मारीन’ असे मी मॉरिसला धमकावले होते. त्यामुले मॉरिस कैचीत सापडला होता. तो क्रिस्तिनापासुन दूर जाऊ पहात होता पण तेहि शक्य नव्हते. तो गांगरला होता. मात्र त्याला कायद्याप्रमाणे बंधनकारक असलेली आजन्म तुरुंगवासाची शिक्षा झाली.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अशा अनेक केसेस मध्ये अपिले करण्यात येत आहेत. प्रत्येक राज्यात वेगळा दृष्टिकोन आहे. काही ठिकाणी ६० वर्षे शिक्षा भोगल्यावर सोडावे असे ठरले आहे!
मॉरिसच्या केसमध्येहि अपिले होणार आहे. त्याचे अल्पवय, त्याच्यावरचे प्रचंड दडपण व अगतिकता यावर भर दिला जाईल.
दुसरी बाजू अशी. क्रिस्तिना मारली गेली. मूलहि गेलेच. तिची आई काही महिन्यात गेली आजीहि गेली. क्रिस्तिनाची बहीण २२ वर्षांची होती ती म्हणते ‘एका वर्षात माझ्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यु झाला. माझ्यावर प्रचंड आघात झाला.’
आता मॉरिसच्या शिक्षेचा फेरविचार करायचा तर ते तिला अजिबात मान्य नाही. एक संपलेला विषय पुन्हा उकरून काढावयाचा व कालांतराने कां होईना चारांच्या मृत्यूला कारण झालेला मॉरिस पुन्हा मोकळा व्हावयाचा हे तिला सहन होत नाहीं!
कोणाचे चूक, कोणाचे बरोबर? उत्तर नाहीच. मला प्रश्न एकच. अमेरिकेसारख्या सुधारलेल्या राष्ट्रात अल्पवयीन गुन्हेगाराला, गंभीर गुन्ह्यासाठी कां होईना, आजन्म कारावासाची अघोरी शिक्षा कां दिली जात होती? भारतामध्ये जन्मठेप म्हणजे १४ वर्षे शिक्षा. सावरकरांचे एक अपवादात्मक उदाहरण कीं त्याना दोन जन्मठेपी सुनावल्या व त्या एकत्र नव्हे तर एकामागून एक सोसावयाच्या होत्या. भारतावर अमेरिकनांचे राज्य असते तर ‘आजन्म कारावास!’ सुधारलेले राष्ट्र?
No comments:
Post a Comment