रोज वर्तमानपत्रे वाचताना वा बातम्या ऐकताना वा इतर वेळीहि काही सुचत राहातं जे लोकांसमोर मांडावं असं वाटतं. अशा विषयांवर वेळोवेळी येथे लिहिणार आहे. वाचकाना हा उपक्रम आवडेल आणि त्यांच्याहि विचारांना चालना देईल अशी आशा आहे.
Friday, October 26, 2012
अल्पवयीन गुन्हेगार.
Saturday, October 20, 2012
व्याधीपेक्षा इलाज भयंकर - पुढे चालू
पाठ वा मानदुखीवर इलाज म्हणून पाठीच्या कण्यात द्यावयाच्या इंजेक्शनमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे अनेकाना मेनिंजायटीसची बाधा झाल्याची बातमी छापून आल्याचे लिहिले होते. आता तशा अनेक केसेस उघडकीस येत आहेत. अद्यापपर्यंत २४७ केसेस झाल्या आहेत व १९ पेशंट दगावले आहेत. १७००० पेक्षा जास्त त्या इंजेक्शनचे डोसेस त्या फार्मसीने पाठवले असल्याचे उघडकीस आले आहे. यातल्या किती डोसेसमध्ये इन्फेक्शन झाले होते ते निश्चित नाही. यातले इंजेक्शन ज्या कोणाला दिले गेले असेल त्या सर्वांशी संपर्क साधून सावध रहाण्यास कळवले जात आहे. फंगस इन्फेक्शन झालेल्यांना फंगसविरोधी औषधे दीर्घकाळ द्यावी लागतील. त्यांचेही काही दुष्परिणाम होतील. सध्यातरी ज्याना प्रत्यक्ष इन्फेक्शन झालेले उघडकीस आले नसेल त्याना Preventive म्हणून लगेच ही औषधे दिली जाणार नाहीत कारण इन्फेक्शन नसेलच तर त्या औषधांचे पेशंटच्या किडनी हृदय व लीव्हरवर वाईट परिणाम होतील! ही औषधे पुरेशी उपलब्धही नाहीत.
एवढ्याने भागले नाही. ही इंजेक्षने बनवणाऱ्या कंपनीच्या इतर अनेक औषधांच्या लक्षावधी डोसेस मध्येही इन्फेक्शन असण्याची शक्यता आणि धास्ती वाटते आहे. त्यांची अशी इतर इंजेक्शन्स ओपन हार्ट सर्जरी, नेत्र शस्त्रक्रिया अशासाठी वापरली जातात. त्यामुळे त्या कंपनीने पुरवठा केलेल्या इतर औषधांच्या लाखों डोसेसबद्दलही शंका निर्माण होऊन भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा सर्व औषधांचा पाठपुरावा चालू आहे. या कंपनीबद्दल पूर्वीही तक्रारी आल्या होत्या आणि त्यांची पुरेशा गांभीर्याने दखल घेतली गेली नव्हती असेही उघडकीस आले आहे. आता काही कोंग्रेसमेन या सगळ्या घोटाळ्याचा पाठपुरावा करत आहेत.
मात्र किती लोकांच्या जीवाशी खेळ होणार आहे ते पहावयाचे.
भारतात असे काही झाले असते तर इतका पाठपुरावा झाला असता काय ही शंकाच आहे. कसेही करून प्रकरण मिटवले जाण्याची शक्यताच जास्त!
Sunday, October 14, 2012
कोळसा आणि तेल
अमेरिकेत कोळसा खूप उपलब्ध आहे. कोळशाचा उपयोग विद्युतनिर्मितीसाठी गेली अनेक वर्षे मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र अलीकडे पर्यावरणावर कार्बन-डाय-ऑक्साईड मुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव झाल्यामुळे कोळसा जाळून विद्युतनिर्मिती करणे योग्य नाही हा विचार बळावला आहे. काही कोळशावर चालणारी विद्युतकेंद्रे बंद झाली आहेत. कोळशाची मागणी झपाट्याने कमी होत आहे. कोळसा उत्पादकांवर घटत्या मागणीचा दबाव पडत आहे. त्या बरोबरच अमेरिकेत नैसर्गिक वायूचे उत्पादन भराभर वाढत आहे. Hydraulic Fracturing or Fracting या पद्धतीने नैसर्गिक वायू भरपूर मिळू लागला आहे. त्याचाही कोळशाच्या विद्युतउत्पादनासाठी होणाऱ्या वापरावर परिणाम होत आहे. मग आता कोळशाच्या खाणी चालवणाऱ्या कंपन्यांनी कोळशाचे करायचे तरी काय असा प्रश्न उभा राहिला आहे.
त्यावर उपाय म्हणजे कोळशाची निर्यात! कोळसा अमेरिकेत जाळला गेला नाही म्हणजे झाले मग तो चीनमध्ये जाळला गेला तर पर्यावरण हानीला चीन जबाबदार, अमिरेका नव्हे!
अमेरिकेचा पश्चिम भाग सोडला तर इतर भागातून कोळशाची निर्यात झपाट्याने वाढत आहे. पश्चिम भाग मागे राहू नये यासाठी पश्चिम किनाऱ्यावर नवीन कोळसा-निर्यात बंदरे बांधली जात आहेत. खाणीपासून बंदरापर्यंत कोळशाच्या वाहतुकीसाठी नवीन रेल्वे लाईन बनते आहे.
मात्र या भागातील मूळ अमेरिकन इंडियन लोकांचा या बंदराना विरोध होतो आहे. कोळशाचा माशांवर विपरीत परिणाम होईल अशी साधार भीती त्याना वाटते. कोणे एके काळी या इंडीयन लोकांशी काही करार केले गेले होते. त्या अन्वये त्यांचा परंपरागत मासेमारीचा या भागातील हक्क मान्य केलेला आहे. पर्यावरणवाद्यांचाही या कोळसा बंदराना जोरदार विरोध आहे. इंडियन लोकांच्या सहभागामुळे विरोधाची धार तीव्र होत आहे. तरी शेवटी भांडवलशाही यातून मार्ग काढीलच हे नक्की!
याच संदर्भात आणखी एक बातमी वाचली. कॅनडा मध्ये तेलात भिजलेली रेती असलेले काही प्रचंड भूभाग आहेत. तेथे अक्षरश: ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडून’ ते तेल मिळवले जाते. इतर ठिकाणी तेलाच्या विहिरीतून मिळणाऱ्या खनिज तेलापेक्षा हे खूप दाट व घट्ट असते. हे तेल कॅनडापासून अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत वाहून नेले तर तिथल्या शुद्धीकरण कारखान्यात त्यावर प्रक्रिया करून पेट्रोल, डीझेल वगैरे मिळवता येईल. त्यासाठी एक मोठी पाइपलाइन उत्तर-दक्षिण, कॅनडापासून गल्फ ऑफ मेक्सिको पर्यंत टाकण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. त्याला अनेकांचा अनेक कारणांसाठी विरोध आहे. प्रेसिडेंट ओबामा यांनी सध्यातरी दक्षिणेच्या काही भागाला परवानगी दिली आहे व उरलेल्या पाइपलाइनच्या मार्गामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता विचाराधीन आहे. निवडणुकीनंतर ओबामा अध्यक्ष राहिले तर ही पाइपलाइन नक्कीच मार्गाला लागेल. परवानगी मिळालेल्या भागाचे काम हल्लीच सुरु झाले आहे. त्यासाठी ५० फुट रुंदीचा जमिनीचा पट्टा त्या कंपनीला मोकळा करावा लागणार आहे. झाडे तुटणार आहेत. काही लोकांच्या जमिनीतून मध्येच लाईन गेल्यामुळे दोन तुकडे होणार आहेत. या कारणांमुळे स्थानिकांचा जोरदार विरोध चालला आहे. भारतातल्या चिपको चळवळीच्या धर्तीवर निदर्शने होताहेत आणि तीं मोडूनही काढली जात आहेत. शेवटी भांडवलशाही आपला मार्ग शोधतेच!
Thursday, October 11, 2012
व्याधीपेक्षा इलाज भयंकर
पाठदुखी ही उतार वयात अनेकाना सतावणारी व्याधि. भारतात तिच्यावर फार गंभीरपणे उपाययोजना केली जात नसावी अशी माझी समजूत आहे. ‘असा काही त्रास या वयात व्हायचाच’ असे मानून सोसत रहाणे वा काही किरकोळ इलाज करणे एवढ्यावर भागवले जाते. माझ्या आईची पाठ अनेक वर्षे कमीजास्त दुखत असे.
अमेरिकेत तसे नाही. प्रत्येक व्याधीवर उपाय हवाच असे मानले जाते. दरवर्षी येथे ५० लाख व्यक्तींवर पाठ वा मानदुखीवर जालीम इलाज केला जातो. तो म्हणजे पाठीच्या कण्यात मणक्यांमधून सुई घालून Steroid या नावाने ओळखले जाणारे एक ओषध Inject केले जाते. त्याचा उपयोग होत असावा पण कायमचा नव्हेच. वेळोवेळी इंजेक्शन घ्यावे लागत असणार.
सध्या या बाबत एक खळबळ जनक बातमी वाचावयास मिळत आहे.
हे इंजेक्शन कोणत्याही मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीकडून रेडीमेड मिळत नाही. ते छोट्या फार्मसीमध्ये बनवून मिळते. हल्लीच हे बनवणाऱ्या एका कंपनीच्या डोसेस मध्ये फंगस इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे ज्याना त्यातले इंजेक्शन दिले गेले त्याना काही दिवसातच मेनिंजायाटीसचा गंभीर विकार जडला. आणि त्यातून काही जण दगावले. १७६७६ डोसेस त्या कंपनीने बाजारात पाठवले होते असे आढळून आले. त्यातून १३००० चे वर लोकांना इन्फेक्शन होण्याची शक्यता दिसून आली आहे. १०५ प्रत्यक्ष केसेस आढळल्या आहेत व त्यातील ८ लोक अद्याप दगावले आहेत. आणखी अनेक केसेस होण्याची अपेक्षा आहे. या सर्वांशी संपर्क साधून सावध रहाण्यास व काही लक्षणे आढळल्यास हयगय न करण्यास कळवले आहे. कारण फंगसचा परिणाम दिसून येण्यास ४ आठवडे लागु शकतात. लागण झालेल्यांना उपाययोजनाही दीर्घकाळ घ्यावी लागणार आहे कारण फंगसवर कोणतेच ओषध उपयुक्त ठरत नाही.
आता ही कंपनी व तशा इतर फार्मासीजच्या कार्यपद्धतीची चौकशी सुरु आहे. ही विशिष्ट कंपनी आता बंद झाली आहे. चौकशीत नेहेमीचे सर्व आर्थिक व राजकीय दबाव कार्यरत आहेत !
भारतात अशा उपाययोजनांचा फार प्रसार नाही हे चांगलेच आहे म्हणावयाचे.
Subscribe to:
Posts (Atom)