ग्लास- ब्लोइंग
ही एक अद्भुत कला आहे पण ती आपणा सर्वसामान्यांच्या फारशी परिचयाची नसते. आजच्या पेपरमध्ये फोर्ड नावाच्या एका अशा कलाकाराची माहिती वाचली. दिवसा तो काचेची शास्त्रीय उपकरणे – उच्च दर्जाचीं व गुंतागुंतीच्या रचनेचीं – बनवणार्या कारखान्यात ग्लास-ब्लोइंगचे काम करतो व रात्री स्वतःच्या गॅरेजमध्ये आपल्या कलेचा वापर करून सुंदरसुंदर बस्तू बनवतो. त्याना कलात्मक मूल्य असतेच पण उत्तम किंमतही मिळते. त्याच्या कारखान्यातील कामाचे व कलेचे नमुने पहा.
औम शिनरिक्यो
१९९५ सालची जपानच्या टोकियो शहरातील एक भीषण बातमी अजून अनेकांच्या स्मरणात असेल. वर नाव दिलेल्या एका विचित्र व अघोर पंथाच्या काही लोकानी टोकियोच्या सबवे मध्ये मृत्युवायु सोडून हाहाःकार माजवला होता. १२ प्रवासी व एक स्टेशन कामगार त्यात मेले आणि इतर हजारोना यातना सोसाव्या लागल्या. त्या पंथाचे काही पुढारी व मुख्य गुरु ‘शोको आसाहारा’ तेव्हाच पकडले गेले पण काही आरोपी सापडले नव्हतेच. त्यातील एक स्त्री –नाव ‘किकुचि’ - टोकियोच्या परिसरात गरीब वस्तीत नाव बदलून एका सुतारकाम करणाराबरोबर 'तशीच'रहात होती व कोणाच्याही नजरेत येऊ नये अशा प्रकारे ‘कोणाच्या अध्यात ना मध्यात’ असे दिवस काढत होती. ओळखण्याचा धोका टाळण्यासाठी त्यानी लग्नहि केले नव्हते! अचानक कोणीतरी तिला जुन्या काळातील पोलिसांच्या फोटोवरून अखेर ओळखलेच व ती पकडली गेली.
जुन्या व नव्या फोटोंमध्ये साम्य आहे पण ओळख पटणे सोपे नाही. ओळखणाराला पोलिसांकडून १,२५००० डॉलर बक्षीस मिळाले. आता तिच्याकडून मिळवलेल्या माहितीवरून एक अखेरचा फरारी आरोपीहि – नाव ‘टाकाहाशि’ - पकडता येईल अशी पोलिसाना आशा आहे. जपानमधील जनतेने ते सर्व प्रकरण विसरून जाण्याचे ठरवले होते पण पुन्हा एकदा त्या भीषण स्मृति जाग्या झाल्या आहेत.
एका पोस्ट मध्ये मानवी मेंदूचा विधायक तर दुसर्या पोस्ट मध्ये विध्वंसक वापर केल्याचा उत्कृष्ट उदाहरण तेथी एकाच देशाचे दिले आहे.
ReplyDelete