Wednesday, May 30, 2012

भाषांतरकार आणि डायव्होर्स हॉटेल्स.

भाषांतरकार
अमेरिकन कोर्टांमध्ये इंग्लिश न येणारांसाठी भाषांतरकार मिळण्याची सोय कायद्याने केली आहे. १९७८ च्या या कायद्याप्रमाणे या सोयीसाठी खर्च मात्र केस हरणार्‍या पक्षकाराला सोसावा लागतो. कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहून भाषांतर करणारा वापरला तर खर्चाची अट स्पष्ट आहे. मात्र कागदपत्रांचे भाषांतर करावे लागले व ते करून घेतले तर त्यासाठी झालेल्या खर्चाचे काय? कायद्यामध्ये Interpreter असा शब्दप्रयोग आहे. Interpreter चा अर्थ कसा लावायचा? कागदपत्रांचे भाषांतर करून देणारास Interpreter म्हणायचे कीं नाही? असा मुद्दा हल्ली एका केस मध्ये उपस्थित झाला! एका जपानी बेसबॉल प्लेयरचा पाय एका रिझॉर्ट्मध्ये एका डेकवरून चालताना फळी मोडून अडकला व इजा झाली. त्या जपानी खेळाडूने रिझॉर्ट मालकावर केस केली. ती केस तो हरला हे एक, मात्र तो हरल्यामुळे रिझॉर्टमालकाला काही जपानी कागदपत्रांचे भाषांतर करून घ्यावे लागले होते त्याचा खर्चहि त्या खेळाडूला सोसावा लागला. प्रश्न उभा राहिला कीं Translator ला Interpreter म्हणावयाचे काय? केस वर सरकत सुप्रीम कोर्टापर्यंत गेली!
सुप्रीम कोर्टाने ६ विरुद्ध ३ मताने निकाल दिला की ‘नाही’! एका प्रसिद्ध भाषांतरकाराचे उदाहरण देऊन त्यानी म्हटले कीं त्याने इलियड, ऑडिसी वगैरेची इंग्लिशमध्ये उत्तम भाषांतरे केली पण म्हणून त्याला इलियड-ऑडिसीचा Interpreter म्हणावयाचे काय?
शब्दशः विचार केला तर हे बरोबर वाटते पण कायद्याचा उद्देश लक्षात घेतला तर संवादाचे भाषांतर आणि लिखित मजकुराचे भाषांतर दोन्हीमध्ये फरक करण्याचे काही कारण नाही. उद्देश उघडच भाषा न कळणाराला अडचण येऊ नये व त्यापोटी अन्याय होऊ नये हा असल्याने कायद्यात शब्द जरी Interpreter असा वापरला असला तरी त्याचा Translator असा अर्थ करणेच उचित. तेव्हा ३ जज्जानी लावलेला अर्थ जास्त योग्य! कायदा गाढव असतोच पण जज्जहि असतात असे म्हणावेसे वाटते.

डायव्होर्स हॉटेल



कशी काय वाटते कल्पना? अनेक प्रकारची हॉटेल्स असतात, अगदी अल्प दराच्या मॉटेल्स पासून प्रचंड दराच्या, हजारो खोल्यांच्या लास व्हेगास मधील हॉटेल्स पर्यंत अनेक प्रकार. पण डायव्होर्स साठी खास हॉटेल्स? होय आता तशी पण खास हॉटेल्स निघत आहेत. हॉलंड मध्ये हा प्रकार हल्लीच सुरू झाला आहे. म्हणजे कल्पना अशी, तुमचे घटस्फोट घेण्याचे नक्की झाले आहे आणि फारसे वादविवाद आणि भांडणे नाहीत ना?, मग एका वीक एंडसाठी दोघे आमच्या हॉटेलात मुक्कामाला या. शनिवार, रविवार तुम्ही दोघे, तुमचे वकील (हवे असल्यास) आणि मध्यस्थ (तो आम्ही देऊं हवा तर), असे एकत्र बसा, चर्चा करा आणि कागदपत्रे पुरी करून, रविवारी संध्याकाळी विभक्त होऊन हसत खेळत बाहेर पडा. आमचा स्टाफ तुम्हाला सर्व सुखसोयी पुरवील आणि त्रास होऊ देणार नाही. सर्व कामासाठी आमची एकूण फी अमुक-अमुक, तेवढी द्या म्हणजे काम झाले!
अर्थात हॉटेलमधल्या सर्वच खोल्या या कामासाठी नसतात. पण लोक हॉटेलात खोल्या घेऊन लग्ने लावतात, समारंभ करतात, मीटिंग्ज घेतात तसेच घटस्फोट हे आणखी एक काम येथे होते!
हॉलंड्मध्ये प्रथम सुरू झालेल्या अशा ठिकाणी अद्याप १७ असे यशस्वी घटस्फोट झाले आणि आता तशा तर्‍हेची सोय अमेरिकेतील हॉटेल्समध्येहि उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू आहे.
मात्र अमेरिकेतील घटस्फोटाच्या केसेस लढवणार्‍या वकिलाना हा प्रकार हास्यास्पद वाटतो! कारण उघड आहे.त्याना केसेस लढवण्यात खरे स्वारस्य! जोडप्याकडे पैसा रग्गड असेल तर मग पहायलाच नको, दोन्हीकडील वकिलांची चांदीच! त्यामुळे त्यानी ही कल्पना उडवून लावली आहे!

No comments:

Post a Comment