रोज वर्तमानपत्रे वाचताना वा बातम्या ऐकताना वा इतर वेळीहि काही सुचत राहातं जे लोकांसमोर मांडावं असं वाटतं. अशा विषयांवर वेळोवेळी येथे लिहिणार आहे. वाचकाना हा उपक्रम आवडेल आणि त्यांच्याहि विचारांना चालना देईल अशी आशा आहे.
Thursday, March 28, 2013
कायदा आणि गणित
कायदा गाढव असतो असे सर्वजण मानतात. पण कायद्याला गणित समजत नाही असेहि दिसते!
इटलीमधील एका केस मध्ये असे दिसून आले कीं न्यायाधीशाना गणित येत नाही व समजतहि नाही त्यामुळे एका केसमध्ये आरोपीची शिक्षा अपिलात रद्द करण्यात आली होती. आता वरच्या कोर्टाने तो निर्णय रद्द ठरवून केस पुन्हा चालवण्याचा आदेश दिला आहे.
ही एक गाजलेली केस आहे म्हणे. २००७ साली अमान्डा नॉक्स आणि तिचा मित्र राफाएल सोल्लेसिटो यांच्यावर मेरेडिथ कर्चर नावाच्या ब्रिटिश स्त्रीच्या खुनाचा खटला चालला. कर्चर ही नॉक्सची रूम पार्टनर होती. त्या दोघाना शिक्षा झाली. पुराव्याचा महत्वाचा भाग म्हणजे सॉल्लेसिटोच्या घरात सापडलेला एक सुरा. त्याचेवर रक्त होते व DNA टेस्ट्नंतर ते रक्त मेरेडिथचे असल्याचे सिद्ध झाले. मात्र रक्ताचे सॅंपल फार अल्प असल्यामुळे थोडी अनिश्चिततेला जागा होती. कारण त्यावेळपर्यंत DNA टेस्ट्ची पद्धत तशी नवीन होती. या केसवर निदान १० पुस्तके लिहिली गेली आहेत त्यातले एक खुद्द नॉक्सनेच लिहिले आहे.
२०११ साली जेव्हा नॉक्सचे अपील सुनावणीस आले तेव्हां सरकारपक्षातर्फे अशी मागणी करण्यात आली कीं पुन्हा एकदा डीएनए टेस्ट करावी कारण जरी सॅंपल लहान असले तरी टेस्टिंगच्या पद्धती खूप सुधारल्या आहेत तेव्हा विश्वसनीय निर्णय आता शक्य आहे. मात्र ही मागणी नॉक्सचे वकील व न्यायाधीश यानी नाकारली. मूळच्या टेस्टची शंकास्पद विश्वसनीयता हाच अपिलाचा मुख्य आधार असल्यामुळे वकिलानी तसे करणे नैसर्गिकच होते. पण न्यायाधीशानी असे कां केले? त्याने असा प्रश्न केला कीं मूळ टेस्ट केली तेव्हां जर सर्व जाणकारांचे मते निर्णय काहीसा अविश्वसनीय होता तर आता पूर्वीपेक्षाही लहान सॅंपलवर केलेली तीच टेस्ट निर्णायक कशी ठरेल? या कारणास्तव दुसरी टेस्ट न करतां मूळच्या टेस्टची संदिग्धता विचारात घेऊन व संशयाचा फायदा देऊन दोन्ही आरोपीना मुक्त केले गेले.
न्यायाधीशानी टेस्ट करण्याच्या पद्धतीतील सुधारणा तर विचारात घेतल्या नाहीतच पण गणितशास्त्र समजून घेतले नाही कीं तीच टेस्ट तशाच पद्धतीने केली तरीहि जर मूळचाच निर्णय पुन्हा मिळाला असता तर त्याची विश्वसनीयता गणितशास्त्राप्रमाणे अर्थातच वाढली असती! विरुद्ध निर्णय मिळाला असता तर मात्र दोन्ही वेळचे निर्णय अविश्वसनीय मानावे लागले असते!
आता अचानक वरिष्ठ कोर्टाने हा निर्णय फिरवून दोन्ही आरोपींवर पुन्हा केस चालवली जावी असा आदेश दिला आहे. यामागे नक्की कारण काय हे कळलेले नाही पण दुसरी टेस्ट नाकारणार्या न्यायाधीशाचे गणितशास्त्राचे अज्ञान हेच बहुधा कारण असावे.
आकडेशास्त्राच्या अज्ञानापोटी कोर्टाने चुकीचे निर्णय घेतल्याची अनेक उदाहरणे बातमीत दिली होती. त्यातील एक तर विलक्षणच आहे. ल्युसिया बर्क नावाच्या एका डच नर्सला अनेक पेशंटांच्या मृत्यूला कारण झाल्याचे ठरवून सहा वर्षांची शिक्षा झाली होती. सहा मुले व इतर काही पेशंट तिच्या वॉर्डमधे मेले होते. यात खरे तर तिचा दोष काहीच नव्हता व सुरवातीला ते सर्व मृत्यु नैसर्गिकच ठरवले गेले होते. मात्र तिच्या वॉर्डमध्ये अनेक मृत्यु झाले व असे आपोआप होण्याची गणिती शक्यता सरकारपक्षाच्या एका गणितज्ञाने ३४ कोटीत एक अशी ठरवली होती! या गणितात अर्थातच खूप चुका होत्या पण गणिताच्या अज्ञानामुळे जज्जाने हे प्रमाण ग्राह्य मानून बर्कला दोषी ठरवले. अपिलांमध्ये अनेक गणितज्ञांनी सरकारी गणितातील अनेक चुका दाखवून दिल्या आणि इतर काही पुरावा नसताना निव्वळ तिच्या वॉर्डात अनेक मृत्यु झाले यासाठी तिला गणिताने दोषी ठरवणे अन्यायाचे असल्याचे दाखवून दिले व अखेर ते मान्य करावेच लागले.
ज्याना कायदा कळतो त्याना गणित कळत नाही त्याला काय करणार?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment