अमेरिकेतील वेठबिगार
भारतातून आखाती देशात पोटासाठी जाणार्या भारतीय मजुरांना सोसाव्या लागणार्या जुलमाच्या कथा आपण वाचलेल्या आहेत. अमेरिकेत तसा काही प्रकार असू शकेल काय अशी शंकाहि आपणास येणार नाही. २९ जूनची बातमी आहे कीं वॉल-मार्ट या कंपनीने त्यांच्या एका मासळी पुरवठादार कंपनीवर बंदी घातली आहे. कारण काय तर लुइझियानामधील या कंपनीत काम करणार्या मजुरांना बेकायदा राबवून घेतले जाते असे आढळून आले. इतरहि अनेक ठिकाणी हाच प्रकार आढळला. हे मजूर अर्थातच पोटासाठी परदेशातून आलेले होते. मात्र ते बेकायदा नव्हे तर तात्कालिक अकुशल कामासाठी विशिष्ट प्रकारचा व्हिसा मिळवून कायदेशीरपणेच अमेरिकेत आलेले होते. तशी अकुशल कामे करण्यासाठी अमेरिकेत पुरेसे मनुष्यबळ मिळत नसल्यामुळे असा व्हिसा दिला जातो. अर्थात अशा कामाना मजुरी कमी मिळते हे उघडच आहे. पण तीहि अमेरिकेच्याच नियमांपेक्षाहि कमी आणि कामाचे तास जुलमी, सोयी नाहीत, असाच सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकाराला वॉल-मार्टहि अप्रत्यक्षपणे जबाबदार आहे कारण पुरवठादाराना खरेदीचे दर अतिशय पाडून देण्याबद्दल त्यांची ख्याति आहे. त्यांची सर्व प्रकारच्या मालाची खरेदी फारच मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे त्यांच्या पुरवठादार कंपन्या तांच्यावर लादलेले किमान दर पत्करतात आणि मग खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी आपल्या मजुरांची पिळवणूक करतात. सरकारचे कामगार-खाते देखील अशा प्रकारांकडे फारसे गांभीर्याने पहात नाही कारण शेवटी ते पडले बिचारे परदेशीय मजूर! कोठेहि जा, पळसाला पाने तीनच!
अजब न्याय.
आपले काम उत्तम केल्यामुळे कोणाला नोकरीला मुकावे लागेल काय? असेहि होऊ शकते असा अनुभव मायामी येथील एका लाइफ-गार्डला आला!
Hallandale Beach येथे लाइफ गार्ड म्हणून काम करणार्या तोमास लोपेझला असा अनुभव नुकताच आला. एका बुडत असलेल्या पोहणार्याला वाचवण्यासाठी तो किनार्यावरून पाव मैल धावत गेला. किनार्याचा तो भाग त्याच्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे होता. तेथे जाण्यापूर्वी त्याने कंपनीच्या नियमाप्रमाणे आपला सुपरवायझर येण्याची वाट पाहत थांबणे आवश्यक होते. तसा तो थांबत बसला नाही! हा त्याचा गुन्हा! बीचच्या त्या विशिष्ट भागासाठी सुरक्षिततेचे कॉण्ट्रॅक्ट एका कंपनीला दिलेले होते व लोपेझ त्या कंपनीचा नोकर होता. आपला भाग सोडून तो गेल्यामुळे त्या कंपनीच्या कार्यक्षेत्रात जर दुसरा कोणी बुडू लागला असता तर? त्याला मदत मिळाली नसती आणि कंपनीला जबाबदार धरले गेले असते!
परिणामी लोपेझला नोकरीवरून काढून टाकले गेले! मात्र या प्रकाराबाबत कंपनीवर टीकेचा भडिमार झाला. बुडणाराला वाचवणे हे लोपेझचे काम, ते करण्याबद्दल त्याला शिक्षा होणे कोणालाच मान्य होणे शक्य नव्हते. लोपेझच्या सहकार्यानी त्याला नोकरीवरून काढल्यावर पटापट राजिनामे दिले! ‘तुम्ही लोपेझप्रमाणेच वागाल काय?’ असे विचारता त्यानी होकार दिला. मग कंपनीने त्यानाहि बडतर्फ केले. सर्व बाजूनी टीकेचा भडिमार झाल्याने नाइलाजाने कंपनीने लोपेझला व त्याच्या सहकार्याना पुन्हा नोकरीवर घेण्याचे ठरवले. त्याचे मुख्य कारण म्हणजे लोपेझ आपल्या विभागापासून दूर गेला त्यावेळी कंपनीच्या किनारा विभागात कोणी बुडण्याची भीति निर्माण झाली नव्हती! तेव्हा कंपनीचे काही नुकसान झाले नव्हते. मात्र या सगळ्या प्रकरणामुले लोपेझला येवढा वीट आला कीं त्याने पुन्हा नोकरीवर येण्याचे नाकारले आहे!
No comments:
Post a Comment